अजिंठा जंगलातील लांडग्याची विहिरीतून सुटका, पुन्हा जंगलात सोडले

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) सोयगाव तालुक्यातील वरखेडी खुर्द येथे भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आलेला अजिंठा राखीव जंगलातील एक लांडगा कठडे नसलेल्या खोल विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.५) घडली. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडकीस आली. 

वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे काही तास चाललेल्या बचाव मोहिमेत लांडग्याला सुखरूप बाहेर काढून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्रीच्या सुमारास भक्ष्याचा पाठलाग करत असताना लांडगा विहिरीत पडला. सकाळी विहिरीतून प्राण्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने कुतूहलापोटी ग्रामस्थांनी पाहणी केली असता विहिरीत लांडगा अडकलेला दिसून आला. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक आवश्यक बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. 

विहिरीतील पाण्यात आणि दगडी कडेला अडकलेल्या लांडग्याला कोणतीही इजा होऊ नये यासाठी दोरी, जाळ्याच्या सहाय्याने लाकडी खाट विहिरीत उतरविण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी मोठ्या  संयमाने आणि कौशल्याने लांडग्याला त्या खाटीवर सुरक्षित घेतले. ग्रामस्थांच्या मदतीने दोऱ्यांच्या सहाय्याने त्याला हळूहळू वर ओढून विहिरीबाहेर काढण्यात आले. 

लांडग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तो कोणत्याही गंभीर दुखापतीशिवाय सुरक्षित असल्याचे आढळल्याने त्याला पुन्हा अजिंठा राखीव जंगलात सोडण्यात आले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक साळवे तसेच वनमजूर शेख जावेद, योगेश महाकाळ, सय्यद समदानी आणि ग्रामस्थांच्या सहकायनि यशस्वीरीत्या पार पडली.